Saturday, June 22, 2024

 या वाटेवर एकाकी मी चालत असताना

तुझ्या आठवणी मनात गोंधळ घालत येताना

हृदयाची सम चुकते त्यांना वेचत जाताना


तुझ्याशिवायचा प्रत्येक मी पाऊस टाळत राहिलो

तुझ्यासवेचा पाऊस फक्त मनात माळत राहिलो

खिडकीतूनच पाहिले मी आभाळ दाटत येताना


हे प्रेमगीत विरहगीत झाले कसे

फुलांवर लिहिताना काटे आले कसे

शब्दांना कशी कळते वेदना?


वसंतमागे मी शिशिर दडवून ठेवले

स्वतःशी ही काही खरं काही खोटं बोलून पाहले

गळलेल्या पानांची रास रीचत जाताना




तुझ्या भिजण्याने पावसाळा व्हायचा

आता पावसामध्ये ती बात नाही


तुझ्या भेटीने फुलांचे बहरणे

वसंतामध्ये ती बात नाही


श्वासांनीच खरे बोलणे व्हायचे 

शब्दांमध्ये ती बात नाही


तुझ्या स्पर्शाने गंधाळणे माझे 

अत्तरामध्ये ती बात नाही


तुझ्या सोबती मीच कळलो मला 

आरश्यामध्ये ती बात नाही


~ विशाल


Tuesday, June 18, 2024

 


जेव्हा पहिल्यांदा पाहिलं

तुला बटांशी खेळताना

पांढऱ्याशुभ्र साडीमध्ये

गुलाबी हसताना


वाटलं वसंत फुलला असावा

बहर आला असावा

किंवा स्वप्न आणि वास्तविकतेचा

तो क्षण दुवा असावा


तू खरंच होतीस का?

मी चिमटा काढून बघायला हवं होतं 

काहीतरी कारण काढून तुझ्याशी

बोलायला हवं होतं


खऱ्या होत असतील

पुस्तकातल्या कथा कदाचित

स्वप्न उद्याची चाहूल असेल

कदाचित


तिला चंद्र उगाच नसतील म्हणत

गुलाबाशी तुलना उगाच नसतील करत

तिला त्याच्या नजरेतून बघावं

तुला बघितलं तेव्हा वाटलं





Thursday, June 6, 2024

वाटलं नव्हतं या शहरात

येईन मी पुन्हा

तश्याच असतील या शहरातील

वाटा साऱ्या जुन्या


पुन्हा चिंब पावसात भिजताना

पुन्हा त्याच वाटांवर चालताना

वाटतं जपल्या असाव्या या शहराने 

आपल्या सोबतीच्या साऱ्या खुणा


शहराच्या कानाकोपऱ्यात साठलेलं

तुझं हसणं, तुझं बोलणं

तुझी मिठी, तुझी ऊब

आणि लताचं गाणं


तुझं हसणं, तुझं बोलणं

मनात घर करून राहील

आणि लताच्या गाण्यात

तुझ्या आठवणींचं गूज राहील


वाटलं नव्हतं या शहरात

तुझ्या आठवणींनी वेढलं जाईन

प्रत्येक वळणावर तुझं

अस्तित्व शोधत राहीन


~ विशाल





Sunday, December 31, 2023

दीवारों पर तुम्हारी तस्वीर वैसे ही है 

मेज पर तुम्हारे खत वैसे ही है 

मैं अब भी सुनता हूं वहीं ग़ज़लें

मेरा तुझको लिखना वैसे ही है 

तुम शायद अब पहली सी नही रही

पर मेरा तुझको देखना वैसे ही है

मैं तुझको महसूस कर सकता हूं अब भी 

बिस्तर में तेरी खुशबू वैसे ही है 


 

Tuesday, July 11, 2023

 आपण चुकलो असेल

तू ही चुकली असशील

मी ही चुकलो असेल

तरीही सर्व विसरून

एकमेकांशी भांडत, दूर जात, जवळ येत

कधी वेगळ्या वाटेवर कोलमडून सावरल्यावर 

एकमेकांची सोबत सांभाळत आपण राहलो

कदाचित ते प्रेम असेल

कदाचित तुझी आपुलकी

कदाचित माझी मैत्री

शेवटची भेट म्हणत रात्री जात राहल्या

आणि 

पुढच्या भेटीची आतुरतेने वाट बघितली असेल

तूही आणि मीही

पण एकदा तरी शेवटचं वळण येणार होतंच

एकदा तरी शेवटची भेट 

खरंच शेवटची होणार होती

मी तुला नजरेत पूर्ण भरून घेतलंय

तुझा स्पर्श माझ्यात सामावून घेतलाय

तुझा गंध श्वासांची माळ म्हणून गुंफलाय

आता तू नसणार तरी तुझा सहवास असणार आहे

हे सर्व माझ्या पूर्ण मालकीचं असणार आहे

कायमचं

तुझं, तुझ्याशिवाय

पण एक सांग?

जगण्याचं कारण असणं इतकचं पुरेसं असतं का?

Sunday, February 26, 2023

 आयुष्य तसं फार complicated आहे

म्हणजे

कविता ओठांवर आहे

आणि शब्द नाही

आतला गोंधळ स्तब्ध नाही

हे संथ वाहणारं पाणी

बेभान वारा, काजवे, तारे, चंद्र

गडद अंधार पण रात्र नाही

घरामागच्या बागेतून बीच दिसतो

भरती, ओहोटी, लाटा, समुद्रपक्षी

या क्षितिजाला सूर्यास्त मात्र नाही

आयुष्य काय साधं वाटलं तुला

तू शेक्सपिअर वाचलास?

विनोद आणि वेदनेला अंत नाही


Wednesday, January 25, 2023

 हे चार भिंतीचं अपार्टमेंट

तसंच आहे

घरासारखं


हं, थोडं अस्ताव्यस्त आहे

पण


धुळीने माखलेली पुस्तकं

गंज चढलेल्या स्ट्रिंग्सची गिटार

बेसिन मधील खरकटी भांडी

रूमभर कपड्यांचा ढीग

एवढं सोडलं की बास्स


रित्या बॉटल्स

सिगरेटचा धूर

रंग उडालेल्या पेंटिंग्ज

आणि मेलेली रोपं

एवढं सोडलं की बास्स


बाकी

हे चार भिंतीचं अपार्टमेंट

तसंच आहे

घरासारखं


Tuesday, January 26, 2021

त्या रात्रीचा बेभान पाऊस,
अखंड, मुसळधार, बेधुंद, बेपर्वा
आजपर्यंत भिजलेल्या सर्व पावसांपेक्षा वेगळा
तोपर्यंत पावसाची कधी भीती वाटली नाही
पण तो पाउस वेगळाच आणि वेगळीच रात्रही
ओळखीचं च पण अनोळखी वाटायला लागलेलं
तेच शहर, तोच चौक, तेच चेहरे, तेच लोक
एका बंद टी स्टॉल चा आडोसा घेतला
समोरच तुझं घर होतं
जॅकेटच्या खिशातून अर्धी भिजलेली सिगारेट काढली
शिलगावली
सिगारेट चा धूर विरत जाताना
चोरपावलांनी आलेली तुझी आठवण
तुझे डोळे, तुझा स्पर्श
तुझ्यासोबत चे ते दिवस, ती वर्ष
सगळं नकोसं च वाटलं
पाउस थांबला तेव्हा 
मी तुझ्या घराची बेल वाजवली नाही
का कुणास ठावूक
तसाच मागल्यापावली चालत घरी आलो
त्यानंतर आपण भेटलो ते फक्त कवितेत
माझ्या प्रत्येक कवितेत तुझाच उल्लेख असताना
तूच माझी नेहमी सेफ प्लेस असताना
तो कुठला पाउस की 
तू मला नकोशी वाटलीस?