Tuesday, July 11, 2023

 आपण चुकलो असेल

तू ही चुकली असशील

मी ही चुकलो असेल

तरीही सर्व विसरून

एकमेकांशी भांडत, दूर जात, जवळ येत

कधी वेगळ्या वाटेवर कोलमडून सावरल्यावर 

एकमेकांची सोबत सांभाळत आपण राहलो

कदाचित ते प्रेम असेल

कदाचित तुझी आपुलकी

कदाचित माझी मैत्री

शेवटची भेट म्हणत रात्री जात राहल्या

आणि 

पुढच्या भेटीची आतुरतेने वाट बघितली असेल

तूही आणि मीही

पण एकदा तरी शेवटचं वळण येणार होतंच

एकदा तरी शेवटची भेट 

खरंच शेवटची होणार होती

मी तुला नजरेत पूर्ण भरून घेतलंय

तुझा स्पर्श माझ्यात सामावून घेतलाय

तुझा गंध श्वासांची माळ म्हणून गुंफलाय

आता तू नसणार तरी तुझा सहवास असणार आहे

हे सर्व माझ्या पूर्ण मालकीचं असणार आहे

कायमचं

तुझं, तुझ्याशिवाय

पण एक सांग?

जगण्याचं कारण असणं इतकचं पुरेसं असतं का?

No comments:

Post a Comment