Sunday, March 29, 2020
Saturday, March 28, 2020
Monday, March 9, 2020
Sunday, February 23, 2020
तुझी आठवण येतेय असं नाही
तुझ्याशिवाय जगणं शिकलोय मी
फक्त कधी कधी वेळ जात नाही
एव्हढंच
स्वतः ला कामात गुंतवतो
मुद्दाम कुठल्यातरी मूव्हीज बघत बसतो
मुराकामी च्या एखाद्या पुस्तकात डोकावत
उगाच कुठलीतरी जुनी गाणी ऐकतो
वसंताचा वेध घेणं सोडलंय
पावसाची ही आतुरता राहली नाही
उगाच छतावर बसून
तारे ही मोजत नाही
ज्या वाटेवरून सोबत जायचो
ती वाटच सोडलीय
तुझ्या मिठीत परत यायची
आसही सोडलीय
पुस्तकांवर ची धूळ साफ करून
कपाटात लावलेत
गॅलरीत ले गुलाब ही आता
फुलायला लागलेत
लाइफ एकदम सॉर्ट झालीय असं वाटतं कधीतरी
मग एक झुळूक अंगावर येते कुठून तरी
मी एकटा आहे हे जाणवायला लागतं
हे भयानक कॉम्बिनेशन आहे
एकांत आणि रात्र
एकांतात लवकर रात्र सरत नाही
कधी कधी वेळ जात नाही
एवढंच. ..
- विशाल
Thursday, January 23, 2020
तेव्हासुद्धा असशील तू
माझ्या कवितेत कवितेची
शेवटची ओळ बनून
शब्द हरवलेले नसतील
कविता विस्कटलेली नसेल
कवितेत भरकटलेला
मीही नसेल
शिशिर नसेल
रात्रही नाही
निराशेचा
उल्लेखमात्र ही नाही
तरीही मला सावरलेलंस तशीच
तिलाही गरज असेल तुझी
कधी माझी कविता म्यच्युअर होईल
तेव्हासुद्धा. ..
© विशाल
Sunday, November 3, 2019
एकटाच
यावेळेस तुझी सोबत नव्हती
पण वाटेत फुलांचं मार्केट लागलं
आणि तुझी आठवण आली
गुलाब आणि मोगऱ्याचा सुगंध
दरवळत माझ्यापर्यंत आला
तू सोबत असतीस
तर तुझ्या वेणीत माळला असता गजरा
तुझ्या केसांच्या सुगंधासमोर
कदाचित फिकाही वाटला असता मोगरा
पण आता तू सोबत नाहीस
तरीही मी गजरा घेतला
का?
माहिती नाही
चालत चालत समोर आलो
मार्केट संपलं
स्मशान लागलं
आपल्या आवडत्या व्यक्तींच्या स्मृतीत
फुलं वाहिली जात होती त्यांच्या थडग्यावर
मी हातातल्या गजऱ्याकडे बघितलं
त्याची फुलांची माळ झाली होती
मी सगळं स्मशान शोधून काढलं
कुठे आपल्या प्रेमाचं थडगं पुरलंय
ती जागा शोधत
कुठेतरी कोपऱ्यात एक थडगं दिसलं
माझंच नाव
माझीच जन्मतारीख कोरलेलं
त्यावर मरण्याची तारीख वा वेळ नव्हती
ना 'च्या स्मृतीप्रित्यर्थ' असं ही काही
कुणी मेणबत्ती ही नव्हती पेटवली त्यावर
ना कुणी फुलंही अर्पिलेली
पायातील त्राण संपला
डोकं सुन्न झालं
स्वतःच्याच थडग्यासमोर बसून मी तासभर तरी रडत बसलो असेन
तुझ्यासाठी घेतलेला गजरा
फुलांची माळ म्हणून चढवला मी स्वतःच्याच थडग्यावर
आणि निघालो परत
पुस्तकांच्या शोधात. ..
- विशाल
Saturday, October 26, 2019
नेहमीच कोरं असतं
वहितलं एक पान
मग कुणीतरी येतं
स्वतःच्या वहितली एक कविता
त्यावर कोरून जातं
शिशिरात झाडाचं
एकेक पान गळावं जसं
मग आपल्याच वहितली आपलीच
एकेक कविता हरवत जाते
एकच कविता शिल्लक राहते
एकच कविता
एकच कविता आपण हृदयावर
कोरून ठेवत असतो
तळहाताच्या फोडासारखं
जपून ठेवत असतो
एक दिवस तीच व्यक्ती
कविता मागायला येते
कोरी वही न बघताच आपली
कविता घेऊन जाते
कोरी असते वही पण आता
शब्द नसतात काही
आयुष्यातली पानंही अशी
कोरिच असतात काही
© विशाल
Friday, May 3, 2019
पानगळीत
एकेक पान गळावं
तसं
एकेक क्षण
थोडं थोडं मरत असतो आपण
उध्वस्त आयुष्याच्या राखेतून
कुणी रेखाटतो उभ्या आडव्या रेषा
कुणी त्याला कविता म्हणतं. ..
आणि कविता
म्हणजे असतं तरी काय?
मोडलेलं घर,
विखुरलेलं आयुष्य,
हरवलेली माणसं,
आणि
संपलेल्या आशेशिवाय?
आशावादी कविता म्हणजे
पोरखेळ वाटतो नुसता
कल्पनेपलीकडे काहीच नसतात
मनाला सुखावणाऱ्या कविता
सत्य सुखावत नसतंच कधी
ते बोचतं
ते बोचरेपण मांडते तीच कविता
हल्ली मी लिहीत नाही
कारण
कवितेचा शेवटच सापडत नाही
मग त्या शेवटाच्या शोधात
अशी कविता भरकटत जाते
विषयांतर होत जातं
पण कविता पूर्ण होत नाही
माझा एक कवी मित्र म्हणतो,
अपूर्णतेतच खरं पूर्णत्व असतं. ..
एक ओझं ओसरल्यासारखं
मी सुटकेचा निश्वास टाकतो खरा
पण
कुठेतरी टोचत राहतेच ही जाणीव
की जगायला
कुणाची तरी साथ लागतेच
तसा कवितेलाही शेवट लागतोच
माणसाला पूर्णत्वाचा शाप आहे,
आणि कवितेलाही. ..
- विशाल
Wednesday, May 1, 2019
बऱ्याच दिवसांपासून
तू लिहीत नाहीस काही?
कुठे हरवला, कवी मज मधला
मलाच माहीत नाही
पानगळ व्हावी तसे कवित्व
गळून गेले माझे
या झाडावर वसंतातही
पालवी फुटणे नाही
सूर्य, चंद्र, अन् तारे आणि
फुले, पाखरे, सारे
रुसून गेलेत माझ्यावरती
घरी परतणे नाही
प्रकाश नाही तर म्हणतो
लिहीन तिमिरावरती
मी इतका दुर्दैवी
मजसाठी अंधारही नाही
मज हृदयाच्या कप्प्यामध्ये
रितेपण आहे केवळ
व्यक्त कराया रितेपणास
शब्दही नाही, 'मी'ही नाही
(अपूर्ण)
- विशाल