Sunday, November 3, 2019

पुस्तकांच्या शोधात निघालो होतो
एकटाच
यावेळेस तुझी सोबत नव्हती
पण वाटेत फुलांचं मार्केट लागलं
आणि तुझी आठवण आली
गुलाब आणि मोगऱ्याचा सुगंध
दरवळत माझ्यापर्यंत आला
तू सोबत असतीस
तर तुझ्या वेणीत माळला असता गजरा
तुझ्या केसांच्या सुगंधासमोर
कदाचित फिकाही वाटला असता मोगरा
पण आता तू सोबत नाहीस
तरीही मी गजरा घेतला
का?
माहिती नाही
चालत चालत समोर आलो
मार्केट संपलं
स्मशान लागलं
आपल्या आवडत्या व्यक्तींच्या स्मृतीत
फुलं वाहिली जात होती त्यांच्या थडग्यावर
मी हातातल्या गजऱ्याकडे बघितलं
त्याची फुलांची माळ झाली होती
मी सगळं स्मशान शोधून काढलं
कुठे आपल्या प्रेमाचं थडगं पुरलंय
ती जागा शोधत
कुठेतरी कोपऱ्यात एक थडगं दिसलं
माझंच नाव
माझीच जन्मतारीख कोरलेलं
त्यावर मरण्याची तारीख वा वेळ नव्हती
ना 'च्या स्मृतीप्रित्यर्थ' असं ही काही
कुणी मेणबत्ती ही नव्हती पेटवली त्यावर
ना कुणी फुलंही अर्पिलेली
पायातील त्राण संपला
डोकं सुन्न झालं
स्वतःच्याच थडग्यासमोर बसून मी तासभर तरी रडत बसलो असेन
तुझ्यासाठी घेतलेला गजरा
फुलांची माळ म्हणून चढवला मी स्वतःच्याच थडग्यावर
आणि निघालो परत
पुस्तकांच्या शोधात. ..

- विशाल

No comments:

Post a Comment