Friday, May 3, 2019

पानगळीत
एकेक पान गळावं
तसं
एकेक क्षण
थोडं थोडं मरत असतो आपण
उध्वस्त आयुष्याच्या राखेतून
कुणी रेखाटतो उभ्या आडव्या रेषा
कुणी त्याला कविता म्हणतं. ..
आणि कविता
म्हणजे असतं तरी काय?
मोडलेलं घर,
विखुरलेलं आयुष्य,
हरवलेली माणसं,
आणि
संपलेल्या आशेशिवाय?
आशावादी कविता म्हणजे
पोरखेळ वाटतो नुसता
कल्पनेपलीकडे काहीच नसतात
मनाला सुखावणाऱ्या कविता
सत्य सुखावत नसतंच कधी
ते बोचतं
ते बोचरेपण मांडते तीच कविता
हल्ली मी लिहीत नाही
कारण
कवितेचा शेवटच सापडत नाही
मग त्या शेवटाच्या शोधात
अशी कविता भरकटत जाते
विषयांतर होत जातं
पण कविता पूर्ण होत नाही
माझा एक कवी मित्र म्हणतो,
अपूर्णतेतच खरं पूर्णत्व असतं. ..
एक ओझं ओसरल्यासारखं
मी सुटकेचा निश्वास टाकतो खरा
पण
कुठेतरी टोचत राहतेच ही जाणीव
की जगायला
कुणाची तरी साथ लागतेच
तसा कवितेलाही शेवट लागतोच
माणसाला पूर्णत्वाचा शाप आहे,
आणि कवितेलाही. ..
- विशाल

No comments:

Post a Comment