Saturday, December 10, 2016

माझे मित्र "रोहित सुर्वे, ठाणे" यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन त्यांनाच समर्पित माझ्या पहिल्या एकांकिकेचा प्रयत्न. ..
◆ ◆◆

[बैठकीची खोली. .. साधारण. .. एकटं राहणाऱ्या कुठल्याही तरुणाची असेल तशीच. .. मध्यभागी मागच्या भिंतीजवळ बेड. .. उजवीकडे पुस्तकांचं कपाट, जवळच अभ्यासाचं टेबल, खुर्ची, टेबल वर छोटा लॅम्प, चार-पाच पुस्तके, लिखानाचं साहित्य - पेन्स, पेन्सिल्स, डायरी, कोरे कागद वगैरे, आणि एका तरुणीचा फोटो. .. जवळच एक डस्ट-बीन, पूर्ण भरलेली. .. अवतीभोवती चोळामोळा कागदांचे तुकडे. .. मध्यभागी भिंतीवर एक मोठं गोल आकाराचं घड्याळ, सुमारे अकराचा वेळ. .. डावीकडे एक दरवाजा. .. दरवाज्याच्या आणि बेडच्या मध्ये एक माठ, माठावर एक ग्लास ठेवलेला. .. एका भिंतीवर दुसऱ्या एका सुंदर तरुणीची हसरी पेंटिंग. .. एका भिंतीवर कपडे लटकविलेले. .. बाकी सर्व अस्ताव्यस्त. ..]

[एक तरुण. .. साधारणतः तिशीतला. .. डोळ्यांवर चष्मा. .. साधं चेक्स चं शर्ट आणि फॉर्मल जीन्स. .. दाढी वाढलेली. .. केस वाढलेले. .. काहीतरी लिहित. .. काहीतरी चुकलेलं असावं कारण लिहित असणाऱ्या कागदाचा गोळा करून त्याने डस्ट-बीन कडे फेकून दिला. .. परत काहीतरी लिहायला सुरुवात. ..]

[ट्रिंग ट्रिंग. .. डुअर बेल वाजते. .. तरुण दरवाजाकडे बघतो. .. मग घड्याळाकडे. .. चेहऱ्यावर एव्हढ्या रात्री कोण आलं असेल म्हणून आश्चर्यचकित होण्याचा भाव. .. उठून दरवाजाकडे जातो. .. वरून कळी काढतो. .. दरवाजा उघडतो. .. समोर एक तरुणी. .. साधारणतः त्याच्याच वयीची. .. जास्त शृंगार नाही, फक्त गळ्यात एक मंगळसूत्र, डोक्यावर कुंकू. .. दोन क्षण शांतता. ..]

तरुणी : ओळखलेलं दिसत नाही. ..

तरुण : न ओळखायला आधी विसरावं लागतं. .. तसं दाखवायचं असेल तर गोष्ट वेगळी. ..

तरुणी : मग असा का बघतोय?

तरुण : तू. .. तू इथे का? सॉरी, म्हणजे कशी? म्हणजे या वेळी कशी?

तरुणी : (थोडीशी हसत. ..) मी आत येऊ का? मग देते उत्तरे हवी तर. ..

तरुण : हं? (आपण दरवाज्यातच उभं असल्याचं लक्षात येतं. ..) ओह सॉरी, ये नं. .. (बेड कडे जागा दाखवत. ..) बस. .. (टेबवरच्या फोटो कडे लक्ष जातं. .. तो घाईनेच टेबल कडे जातो. .. फोटो लपवतो. .. तरुणीला शंका येऊ नये म्हणून तिथेच खुर्ची वळवून बसतो. .. अस्वस्थ. .. इकडे-तिकडे नि मग खाली बघतो. ..)

तरुणी : पाणी?

तरुण : हं? (तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत. ..)

तरुणी : एक ग्लास पाणी मिळेल का?

तरुण : हो. .. सॉरी. .. देतो. .. (उठतो. ..)

तरुणी : राहू दे. .. मीच घेते. ..

तरुण : नाही नको. .. म्हणजे देतो मीच. .. (पाणी देतो. ..)

तरुणी : मी आलेली आवडलं नाही का तुला इथे? (पाण्याचे घोट घेत. ..)

तरुण : हं? नाही, तसं नाही. .. पण. .. (घड्याळाकडे बघत. ..) लग्न झालेल्या स्त्रीने असं एकटं राहणाऱ्या अविवाहित पुरुषाच्या घरी या वेळी एकटं येऊ नये? (तिची नजर चुकवतच. ..)

तरुणी : सिड? (प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघत. ..) तू असा विचार कधीपासून करायला लागला?

[तरुण निशब्दच. ..]

तरुणी : बरा आहेस नं तू?

तरुण : अर्थात. ..! म्हणजे बराच आहे. .. आधीपेक्षा तरी. .. लिहितो, त्यातुन थोडंफार कमावतो. .. भागतं माझं. ..

तरुणी : तुझं पुस्तक वाचलं. .. (दोघांच्याही नजरा पहिल्यांदाच मिळाल्या. ..) आधीपेक्षाही छान लिहायला लागलाय. .. (हसते. ..)

तरुण : (तोही थोडासा हसतो. .. खोटंच. ..) ते सोड. .. 'पण तू इथे कशी?' ते सांगितलं नाहीस? आणि इथला पत्ता कसा मिळाला तुला?

तरुणी : तुझ्या पुस्तकावर होता. .. तसं परत भेट व्हावी याचा काहीच मार्ग ठेवला नव्हता तू. ..

तरुण : तसं काही नाहीयेय तनु. .. (चूक सुधारत. ..) तन्मयी. ..

तरुणी : तनु चालेल. ..

तरुण : आता मला तो हक्क नाही. ..

(काही क्षण शांतता. ..)

तरुणी : तू कुणालाही नं सांगता गेलास. ..

तरुण : बदली झाली होती माझी. .. अचानक. ..

तरुणी : मग सांगितलं का नाही?

तरुण : घाईनेच निघावं लागलं. ..

तरुणी : मग कॉल करून सांगू शकला असता. ..

तरुण : माझा सेलफोन हरवला बघ त्याच दिवशी. ..

तरुणी : खोटं बोलतोयेस तू. ..

तरुण : मी का खोटं बोलणार तुझाशी. ..

तरुणी : कारण तसं नसतं तर निदान एक पत्र. ..

तरुण : कामाच्या व्यापात वेळ मिळत नाही. .. बघ रूम देखील आवरायला वेळ नसतो. ..

तरुणी : खरंच वेळ मिळत नाही कि लिहावसंच वाटलं नाही?

तरुण : तसं. ..

तरुणी : तसं काहीही नाहीयेय. .. हेच नं? (तरुणाचं वाक्य मध्येच तोडत. ..) तुझं पुस्तक वाचलंय मी सिड. ..

तरुण : ती एक काल्पनिक कथा आहे. ..

तरुणी : नावं आणि ठिकाणं बदलविली कि कथा काल्पनिक होत नाही. .

तरुण : ज्यात नावं आणि ठिकाणंच खरी नसतात ती कथा खरी कशी असेल?

तरुणी : पुस्तकी बोलू नको. .. (भिंतीवरल्या पेंटिंग कडे बघत. ..) हि पेंटिंग अजून सांभाळून ठेवलीय तू?

(तरुण निशब्दच. ..)

तरुणी : हि पेंटिंग मला का आवडायची माहित आहे?

तरुण : अगदी निरीक्षण केल्याशिवाय लक्षात येणार नाही पण तिच्या डोळ्यात वेदना आहेत. .. पण तिच्या स्माईल नी ती सहजासहजी लक्षात येत नाही. .. वेदना लपवून ओठांवर हास्य ठेवणं आणि त्या वेदनेबद्दल कुणालाही नं कळू देणं हे चित्रकाराने अचूक रंगवलंय. ..

तरुणी : या पेंटिंगमध्ये आणि तुझ्यात मला फारसा फरक जाणवत नाहीयेय. ..

तरुण : मला वाटतं तू जायला हवं. ..

तरुणी : पळपुट्या आहेस तू सिड. .. परिस्थितीशी लढण्याची हिम्मत नाहीयेय तुझ्यात. .. (दोन क्षण शांतता. ..) मी आत येताच माझा फोटो लपविताना तू मला दिसला नाहीस असं वाटतं का तुला? तुझ्या कथेतील पात्र  जरी काल्पनिक असली तरी कथा खरीच आहे नं? ठिकाण काल्पनिक असतील पण घटना?

(तरुण काहीच बोलत नाही. ..)

तरुणी : बरं येते मी. .. तुला फक्त एक प्रश्न विचारायचा होता. .. तुझ्या पुस्तकातील कथेसारखा आपल्या कथेचाही शेवट होऊ शकला असता. .. किंवा पुस्तकातल्या कथेचा शेवट तरी आपल्यासारखाच करायचा होतास. .. अरे सॉरी, तूच म्हणालास नं, तुझी कथाच खोटी आहे म्हणून. .. येते. ..

[ती जाते. .. तो बसतो. .. दिवे जातात. .. अंधार. .. तरुणाचा रडण्याचा आवाज. .. पडदा पडत जातो. ..]

समाप्त. ..

◆ ◆◆

© विशाल इंगळे. ..

No comments:

Post a Comment