Wednesday, November 4, 2026

 

आजकाल माझ्या कवितेत
यमक जुळायला लागलेत…
पण तरीही
काहीतरी हरवलंय कवितेतलं.
कधी एका शब्दासाठी
अर्धी रात्र जागलेली असायची,
कधी शेवटाच्या शोधात
मनात शब्दांची गर्दी व्हायची.
आता मात्र
सगळं जुळून येतंय,
तरी काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय.
कधी यमक शोधत होतो,
आता कविताच तर शोधावी लागत नाहीये ना?
कदाचित यमक जुळवताना
ज्या अस्वस्थतेतून कविता जन्माला येत होती,
तीच अस्वस्थता कुठेतरी हरवलीय…
काल लिहिलेली गझल
सगळ्यांना आवडली…
कौतुकही झालं,
शब्दही जुळले,
शेरांनाही दाद मिळाली…
तरीही
काहीतरी राहिल्यासारखं वाटलं.
कदाचित तुला एवढंच सांगायचं होतं…
तू माझी मुक्तछंद आहेस.