Wednesday, November 1, 2017


आज तुझ्या कवितेत मी वाचले मला
कित्येक दिवसांनंतर मी भेटले मला

मागल्या पानावर नेलेस तू. .. तुझ्या
डोळ्यांच्या आरशात मी पाहिले मला

होता खरा तर तो पानझडीचा ऋतु
तू वसंतासम गुंफला. .. भावले मला

करू नकोस माझी निर्दोष मुक्तता
तू फुल नाव देणे टोचले मला

© विशाल

Saturday, October 14, 2017

आजकाल मी एकटा नसतोच कधी. ..
सतत माझ्या मागावर असतो, कुणीतरी. ..
सावलीसारखा. ..
चेहरा नसलेला,
शरीरही नसलेला,
कुणालाच न दिसणारा. ..
पण मला जाणवतं,
त्याचं माझ्या मागावर असणं. ..
टपोऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे
एकसारखं बघणं. ..
त्याच्या श्वासांचा आवाज
मला स्पष्ट ऐकायला येतो. ..
रात्रीच्या वेळी,
वही, पेन घेवून एकटाच लिहायला बसलो,
की माझी कविता वाचत,
माझ्या खोटेपणावर दात काढत,
हसत असतो बाजूलाच. ..
आरश्यात दिसत नाही,
एक शब्दही बोलत नाही,
अन् सोडतही नाही,
माझा पाठलाग करणं. ..
मी मात्र बोलण्याचा प्रयत्न करतो,
त्याला मोठ्याने ओरडून ओरडून सांगतो,
की माझा पाठलाग सोड,
मला नकोय सोबत हरवलेल्या कुणाचीही. ..
पण त्याच्या श्वासांशिवाय
आणि हृदयाच्या ठोक्यांशिवाय
कधीच, काहीच ऐकायला येत नाही. ..
पण आज ही कविता लिहीपर्यंत,
तो हसला कसा नाही?

- विशाल

Wednesday, September 20, 2017

स्वतःपासूनच सवड काढून
मी येथे येतो. ..
आकाशाच्या कॅनव्हासवरचं
चित्र डोळ्यांत भरून घेतो. ..
वही, पेन, कविता, काहीच
घेऊन मी येत नाही;
पण काहीच न घेता
सहसा इथून जात नाही. ..
दूर शांत वाटणारा सागर,
त्यात प्रतिबिंबाची व्याख्या असते. ..
इथल्या प्रत्येक क्षणात
एक कविता असते. ..
डोळे मिटून घेतो,
किनाऱ्याच्या वाळूवरती लोळत पडतो,
कुठल्यातरी क्षणी मी
ध्यानस्थ झालेलो असतो,
निसर्गाचं संगीत असतंच,
पक्ष्यांच्या,
लाटांच्या,
झाडांच्या,
वाऱ्याच्या,
ध्वनींतून निर्माण होत. ..
कुठून तरी एक हवेची झुळूक येते,
माझ्या निर्वस्त्र शरीराभोवती वेटोळे घेते,
सर्वांगाला स्पर्श करत. ..
शरीराच्या असंख्य छिद्रांमधून
प्रवेश करते माझ्या शरीरात. ..
मी त्या वाऱ्यात विरून जातो,
माझंच अस्तित्व विसरून जातो. ..
एकच होतो वेग,
सागराच्या भरती-ओहोटीचा
आणि
माझ्या हृदयाच्या ठोक्यांचा. ..
सागरासारखंच शांत होतं माझं मनही,
थांबतात सर्व विचार,
आणि
कदाचित श्वासही;
जेव्हा जेव्हा या किनाऱ्यावर येतो नं,
मी माझा राहत नाही. ..

© विशाल

Thursday, September 7, 2017

मी खिडक्या नसलेल्या,
अंधाऱ्या खोलीत बसून विचार करतो,
की बंद दाराच्या मागे,
बाहेर पाऊस कोसळत असेल. ..

वाटतं कुणीतरी येईल,
कधीतरी उघडेल हे दार,
मलाही घेऊन जाईल सोबत
चिंब पावसात. ..

पण असं होत नाही,
कुणीही येत नाही,
माझ्याच मनाचं दार उघडायचं,
मलाही धाडस होत नाही. ..

मी बघतो दाराच्या फटींतून
त्याची झलक दिसावी या आशेने,
बाहेरही गडद अंधारच असतो. ..
कधीही अवकाळी येणारा हा
पाऊसच मुळी तिथे नसतो. ..

मी न वळता मागे चालायला लागतो,
हाताला लागते मोडकळीस आलेली,
जुनाट, लाकडी खुर्ची. ..

आधार घेत खाली बसतो,
डोळे घट्ट मिटून घेतो,
अजूनही सुरूच असलेल्या पावसाचा
आवाज ऐकत बसतो. ..

मी. ..
खिडक्या नसलेल्या. ..
अंधाऱ्या खोलीत बसून. ..

© विशाल

Sunday, September 3, 2017

मी असा विंगेत उभा असेल. ..
मी रंगवित असलेल्या पात्राची
येण्याची वेळ होईल,
आणि मी रंगमंचावर येईल. ..
दोन मिनिटांचंच, छोटंसं. ..
मीच. ..
माझ्याकरिताच लिहिलेलं पात्र
मी रंगवेल. ..
मी सांगेल माझ्या मनात काय आहे तर,
तूला वाटेल पात्राचे संवाद. ..
तू देशील मला तेच गिरवलेले उत्तर,
जे मीच लिहिलेत;
पण तेच उत्तर,
जे नकळत तू देतंच आलीस मला तशीही. ..
मीही नेहमीसारखाच
हसून रंगमंचावरून निघून जाईल,
तुला कळू न देता. ..
बाकीचं नाटक मी बघणार नाही,
मीच लिहिलंय नं?
बरोबर अर्ध्या तासाने नाटक संपेल,
टाळ्यांचा कडकडाट होईल,
मी परदा हळूच सरकवून विंगेतून बघेल,
तुझ्या चेहऱ्यावरून आनंद पाझरत असेल. ..
ब्लॅकआउट होईल, परदा पडेल. ..
तू माझ्याकडे येशील,
मला मिठीही मारशील कदाचित. ..
म्हणशील "काय मस्त नाटक लिहिलंय!". ..
मी म्हणेल, "नाटक मस्त नव्हतं,
तुझा अभिनय जिवंत होता. ..!". ..

© विशाल

Thursday, August 31, 2017

तो दुष्ट अर्जुन म्हणतो कसा?
गुरूजी अंगठा मागा. ..
मी म्हंटलं घ्या, खुशाल घ्या. ..
कवितेला कुठे असते तशी पण,
कागद-पेनाची गरज ..?
माझे शब्द ऐकून
तो लालबुंद झाला,
मस्तकात गेली त्याच्या
तळपायाची आग. ..
म्हणतो कसा?
मग जीभच मागा या शूद्राची. ..
मी म्हंटलं घ्या खुशाल. ..!
कविता माझी,
इंद्रियांची मोहताज नाही. ..
वाटल्यास डोळेही काढून घ्या,
माझी कविता तरीही दाखवेल तुम्हाला
क्षितिजपल्याडचं तिसरं जग. ..
वाटल्यास ओता गरम तेल कानात,
माझ्या अंतरंगाचा आवाज
माझ्या कवितेतून उतरेल शब्द बनून. ..
आणि अस्वस्थ करत राहीलच तुला यापुढेही. ..
तो म्हणाला शब्दच घेईल तुझे हिसकावून,
मी म्हंटलं,
घे खुशाल. ..
तुझ्या ओठांवरही असेल मग,
माझेच शब्द. ..
माझीच कविता. ..
आणि कितीही प्रयत्न केला तरी
न टाळू शकणारा हा 'मी'. ..!

© विशाल

Saturday, August 26, 2017

कधी कधी वाटतं. ..
की मी लिहिलेली कविता,
तुझ्यापर्यंत पोहोचेल. ..
माझं नाव असणार नाही,
फक्त 'मी' असेल. ..
तरीही,
तू ओळखशील माझी कविता. ..
तुझंही नाव असणार नाही,
फक्त 'तू' असेल. ..
तरीही,
तू ओळखशील माझी कविता. ..
कधी कधी वाटतं. ..
की मी लिहिलेली कविता,
तुझ्यापर्यंत पोहोचेल. ..
(अपूर्ण. ..)

© विशाल इंगळे

Friday, August 25, 2017

One incomplete poems. ..

कधी कधी स्टेशन च्या
त्या गल्लीतून जायचं काम पडतं
आणि मग माझं मन
उगीच अस्वस्थ होतं
म्हणून बहुधा मी टाळत असतो त्या वळणावरून वळणं
पण आयुष्याचंही
चालूच असतं मला छळणं
तेव्हा जावंच लागतं

(अपूर्ण. ..)

Monday, July 17, 2017

दरवर्षी पाऊस पडला,
की तिच्या आठवणीही
मग ओघानेच येतात. ..
तो उठून गच्चीवर येतो. ..
समोरच्या गच्चीवर ती असतेच,
पावसात चिंब भिजत. ..!
तिची कविता होते, त्याचा पाऊस. ..
हल्ली वर्षभर बंद असणारा रेडिओ
कुणाच्यातरी इथे सुरू होतो,
पावसांच्या प्रेमगीतांसोबत. ..!
तिचे गीत होते, तो संगीत. ..
तिला स्पर्शून तोच पाऊस
त्याच्या गच्चीवरही येतो. ..
त्याच्या अंगावर उठणारा
ती मग शहारा होते. ..
मग लक्षात येतं अरे,
हे भिजणं खरं नाही. ..
आता गच्चीवर भिजत
तिचं असणं खरं नाही. ..

© विशाल इंगळे

Tuesday, April 18, 2017

हे आसवांनो, डोळ्यांत माझ्या
आलात का आज सांगा. ..
कुणी जोडीला हृद्यासवे
या नयनांचा धागा. ..

© विशाल इंगळे. ..
(मंगळवार, एप्रिल १८, २०१७; २२:५६)

Thursday, January 19, 2017

वाटते
तुला भेटल्यावर. ..
आता कुणा का. ..?
भेटायचे. .. बोलायचे. ..
जाणायचे. ..

© विशाल इंगळे

विरह
असा कसा
त्या सुर्यास आहे. ..?
कधीपासूनचा जळतोच
आहे. ..

© विशाल इंगळे

मला
कळले निसर्गतत्व. ..
वसंतासाठी आधी ऋतूंना
पानगळ व्हावं
लागतं. ..

© विशाल इंगळे

शोधले
किती दिवसरात्र
मी. .. मला. .. माझ्यामध्येच. ...
तरीही नं
भेटलो. ..

© विशाल इंगळे

बोलायचे
बरेच असते. ..
बघता तुला विसरतो
शब्द सारे
ओठांवरचे. ..

© विशाल इंगळे

उमललो. ..
फुललो. .. बहरलो. ..
गंध बनूनी दरवळलो. ..
मी तुझ्या
सहवासात. ..

© विशाल इंगळे

प्रेमाला
जर मांडायचं
असतं एका शब्दात. ..
नाव तुझंच
असतं. ..

© विशाल इंगळे

Thursday, January 5, 2017


मी
न येणार
तुझ्या स्वप्नांत आता
तू पन्
टाळ

© विशाल इंगळे


मला
खूप छळते
तुझ्याविना हे माझ्या
आयुष्यात उरलेले
एकाकीपण

© विशाल इंगळे


मी
तुझ्यात गुंतलो
न माझा राहिलो
आता सर्वकाही
तूच

© विशाल इंगळे


माझ्या
वेदना कुणा
देवूनी मुक्त होवू
नव्या वेदना
घ्यावयाला

© विशाल इंगळे

● ●●
(वाटलं स्वतःचाही काव्यप्रकार असावा. .. :-P
नियम : १, २, ३, २, १ )

गझलगंधर्व सुधाकर कदम यांच्या "सुधाकरी" ने प्रेरित एक कविता त्यांनाच सादर समर्पित. ..

सुधाकरा तुझी
कविता वाचून
म्हंटलं लिहून
बघायचे. ..

© विशाल इंगळे

Monday, January 2, 2017

तुझं येणं माझ्या आयुष्यात
वसंतासारखं होतं. ..
पानगळीतल्या मला
पालवी फुटली. ..
तुझ्या सहवासात
मी उमललो. ..
फुललो. ..
बहरलो. ..
गंध बनून
दरवळलो. ..

© विशाल इंगळे

Sunday, January 1, 2017

आजचा दिवस नं मला
तुझ्यासोबत घालवायचा होता. ..
नाही म्हणजे तसं
आज विशेष काही नव्हतं. ..
पण. ..
वर्षाचा पहिला दिवस. ..
पहिला दिवस जसा घालवला नं
तर म्हणे वर्ष पण तसंच जातं. ..
येशील नं?
म्हणूनच म्हंटलं होतं. ..
तू आलीस. ..
सुंदर दिसत होतीस. ..
म्हणजे सुंदरच आहेस तू
पण आज तसं सांगावसंही वाटलं. ..
का? ते नाही माहित. ..
तुझं आज भेटणं. ..
आपलं बोलणं. ..
तुझं हसणं. ..
आणि माझं
तुझ्याकडे बघणं. ..
सगळं बरोबरच होतं. ..
मग तुझ्या मैत्रिणी आल्या. ..
तुमच्या गप्पा सुरु झाल्या. ..
आणि मग मी आणि कंटाळा. ..
मी म्हंटलं पण नं?
"कंटाळा येत आहे" म्हणून. ..
तुझं लक्षच नव्हतं कदाचित. ..
नंतर तुझा कॉल आला
कि नं सांगताच का निघालास?
नाही म्हणजे "सोबत" होतीस तू ..
पण तुझी "साथ" हवी होती मला ..
हे अंतर कळेल का तुला?
मग तू थांबलीस
आणि मी एकट्यानेच चालत राहलो. ..
यात चुकलं का माझं?
तुला एकटं सोडलं म्हणून माफ कर. ..
पण मी म्हंटलं होतं नं? "कंटाळा येत आहे". ..
© विशाल इंगळे