Sunday, September 3, 2017

मी असा विंगेत उभा असेल. ..
मी रंगवित असलेल्या पात्राची
येण्याची वेळ होईल,
आणि मी रंगमंचावर येईल. ..
दोन मिनिटांचंच, छोटंसं. ..
मीच. ..
माझ्याकरिताच लिहिलेलं पात्र
मी रंगवेल. ..
मी सांगेल माझ्या मनात काय आहे तर,
तूला वाटेल पात्राचे संवाद. ..
तू देशील मला तेच गिरवलेले उत्तर,
जे मीच लिहिलेत;
पण तेच उत्तर,
जे नकळत तू देतंच आलीस मला तशीही. ..
मीही नेहमीसारखाच
हसून रंगमंचावरून निघून जाईल,
तुला कळू न देता. ..
बाकीचं नाटक मी बघणार नाही,
मीच लिहिलंय नं?
बरोबर अर्ध्या तासाने नाटक संपेल,
टाळ्यांचा कडकडाट होईल,
मी परदा हळूच सरकवून विंगेतून बघेल,
तुझ्या चेहऱ्यावरून आनंद पाझरत असेल. ..
ब्लॅकआउट होईल, परदा पडेल. ..
तू माझ्याकडे येशील,
मला मिठीही मारशील कदाचित. ..
म्हणशील "काय मस्त नाटक लिहिलंय!". ..
मी म्हणेल, "नाटक मस्त नव्हतं,
तुझा अभिनय जिवंत होता. ..!". ..

© विशाल

No comments:

Post a Comment