Sunday, November 3, 2019

पुस्तकांच्या शोधात निघालो होतो
एकटाच
यावेळेस तुझी सोबत नव्हती
पण वाटेत फुलांचं मार्केट लागलं
आणि तुझी आठवण आली
गुलाब आणि मोगऱ्याचा सुगंध
दरवळत माझ्यापर्यंत आला
तू सोबत असतीस
तर तुझ्या वेणीत माळला असता गजरा
तुझ्या केसांच्या सुगंधासमोर
कदाचित फिकाही वाटला असता मोगरा
पण आता तू सोबत नाहीस
तरीही मी गजरा घेतला
का?
माहिती नाही
चालत चालत समोर आलो
मार्केट संपलं
स्मशान लागलं
आपल्या आवडत्या व्यक्तींच्या स्मृतीत
फुलं वाहिली जात होती त्यांच्या थडग्यावर
मी हातातल्या गजऱ्याकडे बघितलं
त्याची फुलांची माळ झाली होती
मी सगळं स्मशान शोधून काढलं
कुठे आपल्या प्रेमाचं थडगं पुरलंय
ती जागा शोधत
कुठेतरी कोपऱ्यात एक थडगं दिसलं
माझंच नाव
माझीच जन्मतारीख कोरलेलं
त्यावर मरण्याची तारीख वा वेळ नव्हती
ना 'च्या स्मृतीप्रित्यर्थ' असं ही काही
कुणी मेणबत्ती ही नव्हती पेटवली त्यावर
ना कुणी फुलंही अर्पिलेली
पायातील त्राण संपला
डोकं सुन्न झालं
स्वतःच्याच थडग्यासमोर बसून मी तासभर तरी रडत बसलो असेन
तुझ्यासाठी घेतलेला गजरा
फुलांची माळ म्हणून चढवला मी स्वतःच्याच थडग्यावर
आणि निघालो परत
पुस्तकांच्या शोधात. ..

- विशाल

Saturday, October 26, 2019


नेहमीच कोरं असतं
वहितलं एक पान
मग कुणीतरी येतं
स्वतःच्या वहितली एक कविता
त्यावर कोरून जातं
शिशिरात झाडाचं
एकेक पान गळावं जसं
मग आपल्याच वहितली आपलीच
एकेक कविता हरवत जाते
एकच कविता शिल्लक राहते
एकच कविता
एकच कविता आपण हृदयावर
कोरून ठेवत असतो
तळहाताच्या फोडासारखं
जपून ठेवत असतो
एक दिवस तीच व्यक्ती
कविता मागायला येते
कोरी वही न बघताच आपली
कविता घेऊन जाते
कोरी असते वही पण आता
शब्द नसतात काही
आयुष्यातली पानंही अशी
कोरिच असतात काही

© विशाल

Friday, May 3, 2019

पानगळीत
एकेक पान गळावं
तसं
एकेक क्षण
थोडं थोडं मरत असतो आपण
उध्वस्त आयुष्याच्या राखेतून
कुणी रेखाटतो उभ्या आडव्या रेषा
कुणी त्याला कविता म्हणतं. ..
आणि कविता
म्हणजे असतं तरी काय?
मोडलेलं घर,
विखुरलेलं आयुष्य,
हरवलेली माणसं,
आणि
संपलेल्या आशेशिवाय?
आशावादी कविता म्हणजे
पोरखेळ वाटतो नुसता
कल्पनेपलीकडे काहीच नसतात
मनाला सुखावणाऱ्या कविता
सत्य सुखावत नसतंच कधी
ते बोचतं
ते बोचरेपण मांडते तीच कविता
हल्ली मी लिहीत नाही
कारण
कवितेचा शेवटच सापडत नाही
मग त्या शेवटाच्या शोधात
अशी कविता भरकटत जाते
विषयांतर होत जातं
पण कविता पूर्ण होत नाही
माझा एक कवी मित्र म्हणतो,
अपूर्णतेतच खरं पूर्णत्व असतं. ..
एक ओझं ओसरल्यासारखं
मी सुटकेचा निश्वास टाकतो खरा
पण
कुठेतरी टोचत राहतेच ही जाणीव
की जगायला
कुणाची तरी साथ लागतेच
तसा कवितेलाही शेवट लागतोच
माणसाला पूर्णत्वाचा शाप आहे,
आणि कवितेलाही. ..
- विशाल

Wednesday, May 1, 2019

बऱ्याच दिवसांपासून
तू लिहीत नाहीस काही?
कुठे हरवला, कवी मज मधला
मलाच माहीत नाही

पानगळ व्हावी तसे कवित्व
गळून गेले माझे
या झाडावर वसंतातही
पालवी फुटणे नाही

सूर्य, चंद्र, अन् तारे आणि
फुले, पाखरे, सारे
रुसून गेलेत माझ्यावरती
घरी परतणे नाही

प्रकाश नाही तर म्हणतो
लिहीन तिमिरावरती
मी इतका दुर्दैवी
मजसाठी अंधारही नाही

मज हृदयाच्या कप्प्यामध्ये
रितेपण आहे केवळ
व्यक्त कराया रितेपणास
शब्दही नाही, 'मी'ही नाही

(अपूर्ण)

- विशाल

Wednesday, February 13, 2019

". ..अब भी अधूरे हैं जो किए थे कभी यहीं
वायदों के काफ़िले हैं इस गुलमोहर के नीचे

अनचाहे वाकये भी यहाँ हैं दबे पड़े
शिकवे हैं कुछ गिले हैं इस गुलमोहर के नीचे. .."

सहसा गुलमोहराचं दिसणं आता कमी झालंय. .. कुण्या अनामिक कवीच्या या ओळी वाचताना एक गोष्ट आठवली. .. कुणी लिहिली माहीत नाही. .. एक भरकटलेली गोष्ट. .. तुकड्यातुकड्यांची. ..

वेशीबाहेर च्या बांधाजवळ एक टुमदार गुलमोहराचं झाड होतं. .. तांबड्या रंगाच्या फुलांनी बहरलेल्या त्या भल्या मोठ्या गुलमोहराखाली बसून सूर्यास्ताच्या किंवा सूर्योदयाच्या वेळी आकाशातील सोनेरी छटा बांधाच्या पाण्यावर पडलेल्या बघताना अगदीच विलक्षण आनंद मिळत असे. .. पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चंद्राचे प्रतिबिंब या सौंदर्यात भरच घाली. .. सहसा बांधाच्या या भागाकडे कुणी भटकत नसे. .. A मात्र कित्येक रात्री चांदण्यांच्या मंद प्रकाशात काहीतरी लिहीत इथे एकटाच पडला असायचा. .. कधी संध्याकाळच्या वेळी क्षितिजाकडे उगाच एकटक बघत राहायचा. ..

Aचं मराठी साहित्यात एम्.ए. झालेलं. .. काही कारणांनी नोकरी मात्र मिळाली नाही. .. मग कुठे हव्या तश्या नोकरीची जाहिरात पडली की मुलाखत देऊन यायचं, पार्ट टाइम एका हॉटेलमध्ये काम करायचं, आणि फावल्या वेळेत कधी विदेशी लेखकांच्या इंग्रजी कादंबऱ्या वाच तर कधी उर्दूतील कविता वाच, कधी तत्त्वज्ञान तर कधी इतिहासावरची पुस्तकं वाच किंवा मग एखादं सुखावणारं संगीतच ऐकत बसायचं असं त्याचं सुरू होतं. .. घर मोडकळीला आलं होतं. .. घरातल्या वस्तूही घरासारख्याच. .. सर्व अस्ताव्यस्त विखुरलेलं. .. धूळ खात पडलेल्या पुस्तकांचा ढीग. .. अडगळीत पडल्यासारखी सन्मानचिन्हं. .. कुठंही पडलेली जुनी पत्रं. .. तसं A घरी सहसा जास्त राहायचाच नाही. .. रात्ररात्र भर गुलमोहराच्या साक्षीनं चांदणं पाण्यात पडलेलं एकटक बघायचं आणि मग काहीतरी लिहीत राहायचं, सकाळ उजाडायच्या आधी अंधारातच घराकडे चालायला लागायचं, संध्याकाळी कामावरून आलं की परत बांधाकडे चालायला लागायचं असाच त्याचा दिनक्रम असायचा. .. नक्की त्याला कशानं झपाटलं होतं? रात्ररात्रभर तो काय लिहीत असावा?

जीवन एक प्रवास आहे म्हणतात. .. जो थांबला तो संपला. .. पण कित्येक वर्ष या एकाच ठिकाणी विस्तीर्ण निळ्याशार आकाशात डोकं खुपसून डौलानं डोलत बहरलेला गुलमोहर  थांबलेलाच होता नं? न संपताच. .. आकाशात उंच भराऱ्या मारत सर्व जग आक्रांदीत करायचं तरी कुठेतरी विसावा घ्यावाच लागतो नं? मग या विसाव्याच्या क्षणांतही आपण थोडं थोडं संपत असतो का?

खरं तर संपणे हा शब्दच मला मान्य नाही. .. जगातल्या कुठल्याही गोष्टीला सुरुवातही नसते आणि अंतही नसतो असं मला वाटतं. .. A नं स्वतःला संपवलं, तरी तो संपला नाही. ..

त्याच गुलमोहराखाली आता एक युगल असतं. .. तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो तिला वेगवेगळ्या कवींच्या कविता ऐकवत असतो. .. कधी खाली पडलेली फुलं गोळा करून ती आश्चर्याने त्यांना न्याहाळत असते तर कधी ते दोघेही हातात हात घेऊन क्षितिजाकडे तासन तास बघत असतात. .. कधी कधी गुलमोहरच त्यांच्यावर आपल्या तांबड्या फुलांचा वर्षाव करतो तर कधी त्यांच्यासाठी ताम्रफुलांचा गालिचाच मांडतो. ..

". ..लाल गुलमोहर की छाँव हो तुम
जो मेरा बोधिवृक्ष है
जिस छाँव में गहराइयाँ टटोलता हूँ अपनी
रोम-रोम को धूप से बचाकर
दुनिया की नज़रों से आँख चुराकर
इसी हरी पहाड़ी के ताल मे
इसी झील के किनारे
चलती हवाओं के साथ
इसी पत्थर पर बैठकर
गुलमोहर की छाँव में
तुम्हारी आँखों को पढ्ना चाहता हूँ. .."

कविता वाचताना तिचा हात तो हातात घेतो, त्या प्रत्येक क्षणी तिला उगाच मोहरल्यासारखं वाटतं. .. गालावर गुलमोहरासारखीच लाली येते. ..

"तुला माहितीये? खूप वर्षांपूर्वी येथे A नावाचा एक व्यक्ती रोज रात्ररात्रभर असाच या क्षितिजाकडे बघत पडलेला असायचा. .. पाण्यावरचं चांदण्यांचं प्रतिबिंब न्याहाळत मग काहीतरी वेड्यागत लिहीत राहायचा. ..", तो. ..
"तो काय लिहायचा?", ती. ..
"माहीत नाही. .. कदाचित एखादी कविता लिहत असेल. .. नंतर त्याने इथेच स्वतःला संपवलं. .."
"असं का?"
"माहीत नाही, कदाचित त्याचं कवितेशीच काहीतरी बिनसलं असेल. .."

बाहेरून डेरेदार दिसणाऱ्या गुलमोहराचं खोड आतून पोखरलेलं असलं तर एक दिवस कुठल्यातरी विजेच्या आघाताने दुभंगून जाईलच. .. उन्हाविरुद्ध बंड करत गुलमोहर बहरत असतो म्हणतात. .. पण गुलमोहराची फुलं सदैव गळत असतातच. .. त्याच्या स्वतःच विरुद्ध बंड केल्यासारखी. ..

संकल्प शर्माची एक कविता आठवली ..

"कल शाम हम मिले थे जहां ,
गुलमोहर के पास .
वही गुलमोहर जिसके तले ,
अक्सर मिला करते थे हम .
मैं अब फिर से खड़ा हूँ ,
उसी दरख़्त के करीब ही ,
जहाँ तुने उठा के 
अपनी पलकें ,
इस तरह छुड़ाया 
कल हाथ अपना ,
जैसे ‘पेन ’ झटक देते हैं 
चलते चलते रुक जाए अगर 

ना जाने क्यूँ 
मुझे उस पल लगा 
के वो गुलमोहर 
उदास है शायद ….

और अब देखता हूँ तो 
वोही गुलमोहर …
एक ही रात में 
कितना सुर्ख हो गया है …

लगता है सारी रात 
सुलगता ही रहा है 
तेरे ख्यालों की बरसात में 
जलता ही रहा है ..
मुझे डर है ये कहीं 
ख़ुदकुशी ना कर डाले …"