स्वतःपासूनच सवड काढून
मी येथे येतो. ..
आकाशाच्या कॅनव्हासवरचं
चित्र डोळ्यांत भरून घेतो. ..
वही, पेन, कविता, काहीच
घेऊन मी येत नाही;
पण काहीच न घेता
सहसा इथून जात नाही. ..
दूर शांत वाटणारा सागर,
त्यात प्रतिबिंबाची व्याख्या असते. ..
इथल्या प्रत्येक क्षणात
एक कविता असते. ..
डोळे मिटून घेतो,
किनाऱ्याच्या वाळूवरती लोळत पडतो,
कुठल्यातरी क्षणी मी
ध्यानस्थ झालेलो असतो,
निसर्गाचं संगीत असतंच,
पक्ष्यांच्या,
लाटांच्या,
झाडांच्या,
वाऱ्याच्या,
ध्वनींतून निर्माण होत. ..
कुठून तरी एक हवेची झुळूक येते,
माझ्या निर्वस्त्र शरीराभोवती वेटोळे घेते,
सर्वांगाला स्पर्श करत. ..
शरीराच्या असंख्य छिद्रांमधून
प्रवेश करते माझ्या शरीरात. ..
मी त्या वाऱ्यात विरून जातो,
माझंच अस्तित्व विसरून जातो. ..
एकच होतो वेग,
सागराच्या भरती-ओहोटीचा
आणि
माझ्या हृदयाच्या ठोक्यांचा. ..
सागरासारखंच शांत होतं माझं मनही,
थांबतात सर्व विचार,
आणि
कदाचित श्वासही;
जेव्हा जेव्हा या किनाऱ्यावर येतो नं,
मी माझा राहत नाही. ..
© विशाल