पानगळीत
एकेक पान गळावं
तसं
एकेक क्षण
थोडं थोडं मरत असतो आपण
उध्वस्त आयुष्याच्या राखेतून
कुणी रेखाटतो उभ्या आडव्या रेषा
कुणी त्याला कविता म्हणतं. ..
आणि कविता
म्हणजे असतं तरी काय?
मोडलेलं घर,
विखुरलेलं आयुष्य,
हरवलेली माणसं,
आणि
संपलेल्या आशेशिवाय?
आशावादी कविता म्हणजे
पोरखेळ वाटतो नुसता
कल्पनेपलीकडे काहीच नसतात
मनाला सुखावणाऱ्या कविता
सत्य सुखावत नसतंच कधी
ते बोचतं
ते बोचरेपण मांडते तीच कविता
हल्ली मी लिहीत नाही
कारण
कवितेचा शेवटच सापडत नाही
मग त्या शेवटाच्या शोधात
अशी कविता भरकटत जाते
विषयांतर होत जातं
पण कविता पूर्ण होत नाही
माझा एक कवी मित्र म्हणतो,
अपूर्णतेतच खरं पूर्णत्व असतं. ..
एक ओझं ओसरल्यासारखं
मी सुटकेचा निश्वास टाकतो खरा
पण
कुठेतरी टोचत राहतेच ही जाणीव
की जगायला
कुणाची तरी साथ लागतेच
तसा कवितेलाही शेवट लागतोच
माणसाला पूर्णत्वाचा शाप आहे,
आणि कवितेलाही. ..
- विशाल
Friday, May 3, 2019
Wednesday, May 1, 2019
बऱ्याच दिवसांपासून
तू लिहीत नाहीस काही?
कुठे हरवला, कवी मज मधला
मलाच माहीत नाही
पानगळ व्हावी तसे कवित्व
गळून गेले माझे
या झाडावर वसंतातही
पालवी फुटणे नाही
सूर्य, चंद्र, अन् तारे आणि
फुले, पाखरे, सारे
रुसून गेलेत माझ्यावरती
घरी परतणे नाही
प्रकाश नाही तर म्हणतो
लिहीन तिमिरावरती
मी इतका दुर्दैवी
मजसाठी अंधारही नाही
मज हृदयाच्या कप्प्यामध्ये
रितेपण आहे केवळ
व्यक्त कराया रितेपणास
शब्दही नाही, 'मी'ही नाही
(अपूर्ण)
- विशाल
Subscribe to:
Posts (Atom)