Saturday, February 10, 2018


कधी,
खूप दिवसांनी नवीन कविता केलीस,
की धूळ खात पडलेल्या जुन्या कवितांची वही
उघडून बघ. ..
कुठली कविता,
कुठल्या दिवशी,
कुणासाठी,
कुठे लिहिलेली,
आठवून बघ. ..
कवितेसोबत जुळलेली एक कहाणी असेल,
कुठल्यातरी पावसाचं गळणारं पाणी असेल. ..
कुठलीतरी कविता मिठीत घेईल,
कुठली तरी कविता टोचून जाईल. ..
कुठलीतरी कविता जपाविशी वाटेल,
कुठलीतरी कविता खोडावीशी वाटेल. ..
कुठल्या कवितेत आशा,
कुठल्या कवितेत निराशा,
कुठल्यातरी कवितेत,
एका अनोळखीची भाषा. ..
कुठलीतरी कविता आता वाटेल निरर्थक,
कुठल्यातरी कवितेत असेल तुझं 'जग'. ..
कवितेतला 'तू' हरवल्याचं जाणवेल,
'तुझीच' कविता विसरल्याचं ही वाटेल. ..
तू वहितलं शेवटचं कोरं पान उघड,
आजचीही कविता ऍड कर,
आणि फेकून दे अडगळीच्या खोलीत. ..
परत. ..
धूळ खाण्यासाठी. ..
- विशाल. ..

No comments:

Post a Comment