Friday, August 10, 2018

आधी आकाशाकडे बघितलं
की निळ्याशार कॅनव्हासवर
ग्रे रंगाने रंगविलेल्या प्रतिमा दिसायच्या
हल्ली काळवंडलेल्या ढगांच्या पुंजक्या शिवाय काहिच दिसत नाही
आशा दिदींची गाणी ऐकून खूप काळ झाला
सौमित्र च्या कविताही वाचल्या नाहीत
चित्र ही काढलं नाही आणि काही लिहिलं ही नाही एव्हढ्यात
मुसळधार पावसात भिजावसं वाटत नाही
बीचवर चालावंसं वाटत नाही
बागेतली गुलाबाची रोपं पाण्याअभावी सुकून गेलीत
पुस्तकांवर धुळीचा ढीग साचतोय
लवकर परत ये
कारण. ..
माझ्या कविताही कृत्रिम व्हायला लागल्यात आता. ..

© विशाल

Saturday, July 21, 2018

खूप दिवस झाले आता, गोष्ट नाही नवी. ..
माझ्यामध्ये, माझ्यासारखा, होता एक कवी. ..

घरून निघालो, वाट पकडली, सोबत होतो तेव्हा. ..
कोण जाणे, कुठे हरवला, आणि केव्हा. ..?

किती वळणं होती मागे, कुठे वळला असेल. ..
पण वळताना त्याने मला सांगितलं का नसेल. ..?

त्याची आणि माझी मतं हल्ली जुळत नव्हती. ..
मला त्याची तत्वही मुळीच कळत नव्हती. ..

कधीतरी त्याचं माझं वेगळंच होणं होतं. ..
त्याच्या तत्वांसोबत माझं असह्य जगणं होतं. ..

वादळासारखं लढणं त्याचं, मला जमलं नाही. ..
विध्वंसाची त्याने कधीही पर्वा केली नाही. ..

नक्की वळलाच असेल नं की दमला असेल तो. ..?
मध्येच कुठेतरी थांबला नसेल नं तो. ..?

(अपूर्ण. ..)

- विशाल. ..

आजकाल पडतात स्वप्ने भयंकर
मी मिटून डोळे झोपणे टाळतो

जरी हृदयात तू सदैव राहते
तरी मी तुला भेटणे टाळतो

एकेकाळी जरी होता जिवलग
आता पावसात भिजणे टाळतो

सोडले मीच होते एकटे म्हणून
माझ्यातल्या मला मी शोधणे टाळतो

सुचतात सर्व अपूर्णच आता
म्हणून मी कविता लिहिणे टाळतो

- विशाल

Saturday, February 10, 2018


कधी,
खूप दिवसांनी नवीन कविता केलीस,
की धूळ खात पडलेल्या जुन्या कवितांची वही
उघडून बघ. ..
कुठली कविता,
कुठल्या दिवशी,
कुणासाठी,
कुठे लिहिलेली,
आठवून बघ. ..
कवितेसोबत जुळलेली एक कहाणी असेल,
कुठल्यातरी पावसाचं गळणारं पाणी असेल. ..
कुठलीतरी कविता मिठीत घेईल,
कुठली तरी कविता टोचून जाईल. ..
कुठलीतरी कविता जपाविशी वाटेल,
कुठलीतरी कविता खोडावीशी वाटेल. ..
कुठल्या कवितेत आशा,
कुठल्या कवितेत निराशा,
कुठल्यातरी कवितेत,
एका अनोळखीची भाषा. ..
कुठलीतरी कविता आता वाटेल निरर्थक,
कुठल्यातरी कवितेत असेल तुझं 'जग'. ..
कवितेतला 'तू' हरवल्याचं जाणवेल,
'तुझीच' कविता विसरल्याचं ही वाटेल. ..
तू वहितलं शेवटचं कोरं पान उघड,
आजचीही कविता ऍड कर,
आणि फेकून दे अडगळीच्या खोलीत. ..
परत. ..
धूळ खाण्यासाठी. ..
- विशाल. ..