(हि कविता माझे प्रिय कवी मित्र आणि मार्गदर्शक , राहुल कुकलकर यांना समर्पित. ..)
दोन मित्र आम्ही
बस स्टॉप वर होतो उभं
घराकडल्या शेवटच्या
बसची वाट बघत
आज उशीर का होतोय हिला उगाच
कळत नव्हतं
वेळही बिचारी दमली असेल तिचंही
संथच चालणं होतं
नुकत्याच झालेल्या पावसाने
साचलेलं डोबरं
दोन झिपऱ्या मुली त्यात
उड्या होत्या मारत
धावत पळत त्या झिपऱ्या मुली
आमच्याचकडे आल्या
हात करून पुढे
निरागसपणे हसल्या
मळलेले, फाटके कपडे तरीही
ओठांवरती हास्य
मला कळलंच नाही त्यांच्या डोळ्यांमधील
चमकीचं रहस्य
मी खिशात हात टाकला
बघितला खिसा चाचपून
मीही हसलो केविलतेने
फक्त त्यांच्याकडे बघून
यशनेही बघितलं खिश्यात त्याच्या
होते फक्त दोनच नाणे
एक एक त्याने दोघांच्याहि हातांवर ठेवले
हसत हसत मुली गेल्या
पलीकडे पळून
बघितलंही नाही त्यांनी
एकदाही वळून
मी यशकडे बघितलं
एक कटाक्ष टाकून
त्याच्या चेहऱ्यावरही होतं
आलं हास्य खुलून
बस आली, आम्ही चढलो
पहिल्याच सीट वरच्या खिडकी जवळ बसलो
बघून एकमेकांकडे
आम्ही उगाच हसलो
एक छोटी चिमणी तेवढ्यात
बस मध्ये चढली
हात करून पुढे तीही
निरागसतेनेच हसली
- विशाल इंगळे
No comments:
Post a Comment