Tuesday, January 26, 2021

त्या रात्रीचा बेभान पाऊस,
अखंड, मुसळधार, बेधुंद, बेपर्वा
आजपर्यंत भिजलेल्या सर्व पावसांपेक्षा वेगळा
तोपर्यंत पावसाची कधी भीती वाटली नाही
पण तो पाउस वेगळाच आणि वेगळीच रात्रही
ओळखीचं च पण अनोळखी वाटायला लागलेलं
तेच शहर, तोच चौक, तेच चेहरे, तेच लोक
एका बंद टी स्टॉल चा आडोसा घेतला
समोरच तुझं घर होतं
जॅकेटच्या खिशातून अर्धी भिजलेली सिगारेट काढली
शिलगावली
सिगारेट चा धूर विरत जाताना
चोरपावलांनी आलेली तुझी आठवण
तुझे डोळे, तुझा स्पर्श
तुझ्यासोबत चे ते दिवस, ती वर्ष
सगळं नकोसं च वाटलं
पाउस थांबला तेव्हा 
मी तुझ्या घराची बेल वाजवली नाही
का कुणास ठावूक
तसाच मागल्यापावली चालत घरी आलो
त्यानंतर आपण भेटलो ते फक्त कवितेत
माझ्या प्रत्येक कवितेत तुझाच उल्लेख असताना
तूच माझी नेहमी सेफ प्लेस असताना
तो कुठला पाउस की 
तू मला नकोशी वाटलीस?