Saturday, July 21, 2018

खूप दिवस झाले आता, गोष्ट नाही नवी. ..
माझ्यामध्ये, माझ्यासारखा, होता एक कवी. ..

घरून निघालो, वाट पकडली, सोबत होतो तेव्हा. ..
कोण जाणे, कुठे हरवला, आणि केव्हा. ..?

किती वळणं होती मागे, कुठे वळला असेल. ..
पण वळताना त्याने मला सांगितलं का नसेल. ..?

त्याची आणि माझी मतं हल्ली जुळत नव्हती. ..
मला त्याची तत्वही मुळीच कळत नव्हती. ..

कधीतरी त्याचं माझं वेगळंच होणं होतं. ..
त्याच्या तत्वांसोबत माझं असह्य जगणं होतं. ..

वादळासारखं लढणं त्याचं, मला जमलं नाही. ..
विध्वंसाची त्याने कधीही पर्वा केली नाही. ..

नक्की वळलाच असेल नं की दमला असेल तो. ..?
मध्येच कुठेतरी थांबला नसेल नं तो. ..?

(अपूर्ण. ..)

- विशाल. ..

आजकाल पडतात स्वप्ने भयंकर
मी मिटून डोळे झोपणे टाळतो

जरी हृदयात तू सदैव राहते
तरी मी तुला भेटणे टाळतो

एकेकाळी जरी होता जिवलग
आता पावसात भिजणे टाळतो

सोडले मीच होते एकटे म्हणून
माझ्यातल्या मला मी शोधणे टाळतो

सुचतात सर्व अपूर्णच आता
म्हणून मी कविता लिहिणे टाळतो

- विशाल