Saturday, October 14, 2017

आजकाल मी एकटा नसतोच कधी. ..
सतत माझ्या मागावर असतो, कुणीतरी. ..
सावलीसारखा. ..
चेहरा नसलेला,
शरीरही नसलेला,
कुणालाच न दिसणारा. ..
पण मला जाणवतं,
त्याचं माझ्या मागावर असणं. ..
टपोऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे
एकसारखं बघणं. ..
त्याच्या श्वासांचा आवाज
मला स्पष्ट ऐकायला येतो. ..
रात्रीच्या वेळी,
वही, पेन घेवून एकटाच लिहायला बसलो,
की माझी कविता वाचत,
माझ्या खोटेपणावर दात काढत,
हसत असतो बाजूलाच. ..
आरश्यात दिसत नाही,
एक शब्दही बोलत नाही,
अन् सोडतही नाही,
माझा पाठलाग करणं. ..
मी मात्र बोलण्याचा प्रयत्न करतो,
त्याला मोठ्याने ओरडून ओरडून सांगतो,
की माझा पाठलाग सोड,
मला नकोय सोबत हरवलेल्या कुणाचीही. ..
पण त्याच्या श्वासांशिवाय
आणि हृदयाच्या ठोक्यांशिवाय
कधीच, काहीच ऐकायला येत नाही. ..
पण आज ही कविता लिहीपर्यंत,
तो हसला कसा नाही?

- विशाल