Thursday, August 31, 2017

तो दुष्ट अर्जुन म्हणतो कसा?
गुरूजी अंगठा मागा. ..
मी म्हंटलं घ्या, खुशाल घ्या. ..
कवितेला कुठे असते तशी पण,
कागद-पेनाची गरज ..?
माझे शब्द ऐकून
तो लालबुंद झाला,
मस्तकात गेली त्याच्या
तळपायाची आग. ..
म्हणतो कसा?
मग जीभच मागा या शूद्राची. ..
मी म्हंटलं घ्या खुशाल. ..!
कविता माझी,
इंद्रियांची मोहताज नाही. ..
वाटल्यास डोळेही काढून घ्या,
माझी कविता तरीही दाखवेल तुम्हाला
क्षितिजपल्याडचं तिसरं जग. ..
वाटल्यास ओता गरम तेल कानात,
माझ्या अंतरंगाचा आवाज
माझ्या कवितेतून उतरेल शब्द बनून. ..
आणि अस्वस्थ करत राहीलच तुला यापुढेही. ..
तो म्हणाला शब्दच घेईल तुझे हिसकावून,
मी म्हंटलं,
घे खुशाल. ..
तुझ्या ओठांवरही असेल मग,
माझेच शब्द. ..
माझीच कविता. ..
आणि कितीही प्रयत्न केला तरी
न टाळू शकणारा हा 'मी'. ..!

© विशाल

Saturday, August 26, 2017

कधी कधी वाटतं. ..
की मी लिहिलेली कविता,
तुझ्यापर्यंत पोहोचेल. ..
माझं नाव असणार नाही,
फक्त 'मी' असेल. ..
तरीही,
तू ओळखशील माझी कविता. ..
तुझंही नाव असणार नाही,
फक्त 'तू' असेल. ..
तरीही,
तू ओळखशील माझी कविता. ..
कधी कधी वाटतं. ..
की मी लिहिलेली कविता,
तुझ्यापर्यंत पोहोचेल. ..
(अपूर्ण. ..)

© विशाल इंगळे

Friday, August 25, 2017

One incomplete poems. ..

कधी कधी स्टेशन च्या
त्या गल्लीतून जायचं काम पडतं
आणि मग माझं मन
उगीच अस्वस्थ होतं
म्हणून बहुधा मी टाळत असतो त्या वळणावरून वळणं
पण आयुष्याचंही
चालूच असतं मला छळणं
तेव्हा जावंच लागतं

(अपूर्ण. ..)